प्रतिपंढरपूरात रथोत्सव उत्साहात साजरा

जानकाबाई की जय विठ्ठलाच्या जयघोषाने दुमदुमली पिंप्राळानगरी
जळगाव (प्रतिनिधी ) ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंप्राळा नगरीत रविवारी 6 जुलै रथोत्सव साजरा झाला. जानकाबाई की जय विठ्ठलाच्या जयघोषाने पिंप्राळा नागरी दुमदुमली होती. पिंप्राळा नगरी तील श्री विठ्ठल मंदिर संस्थान, वाणी पंचमंडळ व ग्रामस्थ मंडळी यांच्या सहकार्याने आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सवाचे आयोजन केले जाते. .
रविवारी श्री विठ्ठल मंदिरात पहाटे पाच वा. विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचा समृद्धी व ऋग्वेद जुनागडे (वाणी) यांच्या हस्ते महाअभिषेक व पूजन झाले. सकाळी सातला वाणी समाजातर्फे अलका व सुनील वाणी, रूपाली व भगवान वाणी, वीणा व दीपक वाणी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. सकाळी साडेअकराला मंदिराचे पुजारी श्याम जोशी यांच्या मंत्रोच्चारात वाणी समाजातर्फे मंगला व मोहनदास वाणी व प्रियंका व सौरभ वाणी यांच्या हस्ते रथाची महापूजा झाली. दुपारी बारासाडेबाराला आमदार सुरेश भोळे, जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव पीपल्स बँकेचे संचालक भालचंद्र पाटील आदींच्या हस्ते रथ महाआरती झाली. याप्रसंगी माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे, मंगलसिंग पाटील, अमर जैन, चंद्रकांत सोनवणे, मयूर कापसे, विजय पाटील, माजी नगरसेविका प्रतिभा कापसे, शोभा बारी आदी उपस्थित होते.
मान्यवरांनी ओढला रथ
बारीवाडा भागातील रथ चौकातून महाआरतीनंतर दुपारी साडेबाराला जानकाबाई की जय व पांडुरंग हरी वासुदेव हरीच्या नामघोषात जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार भोळे आदींसह भक्तगणांनी दोराने रथ ओढण्याचा आनंद लुटला. रथापुढे पालखी, भजनी मंडळ, दिंडी, भगवे झेंडे, गुरव मंगल वाद्य, लेझीम, भवानी देवीची सोंग हे भाविकांचे आकर्षण ठरले.
कार्यकर्त्यांचा सत्कार
श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची अलोट गर्दी, रथोत्सव मार्गावर आयोजक व भाविकांच्या स्वागतासाठी फराळ, चहापाणी व पिण्याचे पाण्याची मोफत सेवा करण्यात आली. तत्पूर्वी, सकाळी दहात आयोजकांतर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोगरी लावणाऱ्यांसह रथोत्सवाच्या पांडुरंग भजनी मंडळ व सत्संग सेवा मंडळातील सदस्य व रथोत्सवासाठी सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
परिसरात भरली जत्रा
रथोत्सवानिमित्त पिंप्राळ्याच्या मुख्य रस्त्यावरील श्री भवानीमाता मंदिरापासून मुख्य चौकापर्यंत व्यावसायिकांनी विविध वस्तू, पदार्थ, खेळणी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. शिवाय, रस्त्यालगतच्या खुल्या भूखंडांवर मुलांसाठी पाळणे, झुले, फिरत्या मोटारगाड्या यांसह विविध खेळण्या खेळण्यासाठी लावण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच तेथे मुलांची गर्दी दिसून आली.
रथोत्सवाला 150 वर्षांची परंपरा
पिंप्राळ्यात (कै.) तोताराम नथ्थूशेठ वाणी यांची एकुलती कन्या जानकाबाईचे तरुण वयात निधन झाले. आपल्या मुलीच्या स्मरणार्थ त्यांनी श्री पांडुरंगाचा एक सुंदर लाकडी कोरीव काम केलेला रथ श्री विठ्ठल मंदिरास अर्पण केला. तेव्हापासून ‘जानकाबाई की जय’च्या जयघोषाने पिंप्राळानगरीत आषाढी एकादशीला रथ काढण्याची परंपरा सुरू आहे. रथाला 150 वर्षे पूर्ण होत आहेत.