
धामोडी, ता. रावेर (प्रतिनिधी) : धामोडी गावाच्या मुख्य रस्त्यावर झुकलेला विजेचा खांब अखेर सरळ करून सुरक्षित बसविण्यात आला असून सामाजिक कार्यकर्ते दिपक रत्नपारखे, रवींद्र मेढे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. महावितरण विभागाने कारवाई करत हा खांब योग्य पद्धतीने बसविल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून धामोडी रस्त्यावर विजेचा खांब धोकादायक स्वरूपात झुकलेला होता. त्यावरून जाणाऱ्या ताराही झुकलेल्या असल्याने वाहनधारक, पादचारी आणि शाळकरी मुलांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला होता. सामाजिक कार्यकर्ते दिपक रत्नपारखे, रवींद्र मेढे यांनी याबाबत निवेदन देऊन तक्रार नोंदवली होती. याबाबत दैनिक लोकशाही वृत्तपत्रात आणि सत्यवाचा यथे बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
अखेर महावितरण विभागाने या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून कर्मचाऱ्यांच्या मदतीने खांब सरळ करून व्यवस्थित बसविण्याचे काम केले. त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका टळला आहे.
दिपक रत्नपारखे, रविंद्र मेढे यांनी या कामाबद्दल महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे तसेच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. सामाजिक कार्यकर्ते दिपक रत्नपारखे, रवींद्र मेढे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम तातडीने मार्गी लागले अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली.




