ST आरक्षणासाठी जळगावमध्ये बंजारा समाजाचा भव्य एल्गार मोर्चा

घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला; पारंपरिक वेषभूषेत हजारो समाजबांधव सहभागी
जळगाव (प्रतिनिधी) : बंजारा आरक्षण कृती समिती, जळगाव जिल्हा यांच्या वतीने अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन आज जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर करण्यात आले. या आंदोलनात जळगावसह आसपासच्या जिल्ह्यांमधून हजारोंच्या संख्येने बंजारा समाजबांधव सहभागी झाले होते. आरक्षणाच्या मागणीसाठी एकजुटीने मैदानात उतरलेल्या समाजाने आपल्या हक्कासाठी जोरदार आवाज उठवला.
शिवतीर्थ मैदानावर सकाळपासूनच बंजारा समाजबांधवांचे आगमन सुरू झाले होते. पारंपरिक वेषभूषा, डोल-ताशांचे वाजवण, बंजारा संस्कृतीचे प्रतीक असलेले पताके आणि पारंपरिक झांज-मृदंग यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक सादरीकरणांनी झाली. विविध लोककलांच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या परंपरा, संघर्ष व इतिहास यांची प्रभावी मांडणी करण्यात आली.
“एक गोर सव्वा लाखेर, जय सेवालाल, एकच पर्व बंजारा सर्व” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. उपस्थितांच्या मुखातून एकाच वेळी उठलेली ही घोषणा समाजातील एकात्मतेचा संदेश देत होती. या मोर्चाच्या माध्यमातून बंजारा समाजाने अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य व केंद्र सरकारकडे ठामपणे आवाज पोहोचवला.
समाजाच्या नेत्यांनी यावेळी भाषणांद्वारे शासनाच्या धोरणांवर टीका करताना मागण्या लवकर मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. एल्गार मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तगडा ठेवण्यात आला होता. संपूर्ण मोर्चा शांततामय वातावरणात पार पडल्याने नागरिकांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शेवटी, या भव्य एल्गार मोर्चातून बंजारा समाजाने पुन्हा एकदा आपली एकजूट व संघर्षशीलता दाखवून दिली. ST आरक्षणाच्या मागणीबाबत सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.




