कायदा-सुव्यवस्था राखण्यात अधिक परिणामकारकता येईल – मंत्री संजय सावकारे

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २०, वरणगाव येथे समादेशक कार्यालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य राखीव पोलीस बलाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. या उपक्रमामुळे पोलीस दलाला अत्याधुनिक सुविधा मिळतील व कायदा-सुव्यवस्था राखण्यात अधिक परिणामकारकता येईल, असे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक २० च्या समादेशक कार्यालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. भूमिपूजनानंतर तत्काळ बांधकामास सुरुवात करण्यात आली असून या नव्या कार्यालयामुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत व प्रशासनिक सुविधा वाढीस लागणार आहेत.
या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी तसेच प्रभाकर शिंदे, समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २० वरणगाव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच श्री. गावीत (पोलीस उपअधीक्षक, भुसावळ), सहाय्यक समादेशक श्री. जाधव, पोलीस निरीक्षक मनोज तायडे, पोलीस निरीक्षक कोसेकर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




