आरोग्यजळगावताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

धनाजी नाना समाजकार्य महाविद्यालयाला सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन भेट

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि एस.के.ऑइल इंडस्ट्रीजचे योगदान

जळगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगाव यांच्या पुढाकाराने आणि एस. के. ऑइल इंडस्ट्रीज यांच्या आर्थिक योगदानातून धनाजी नाना समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन भेट देण्यात आली. या मशीनचे हस्तांतरण आज दि. १२ जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी रेडक्रॉसच्या जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थिनींच्या आरोग्याचा विचार करून एस. के. ऑईल मिल इंडस्ट्रीजने दाखविलेल्या सामाजिक दातृत्वाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली व विद्यार्थिनींनी या सुविधेचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले.

रेडक्रॉसच्या चेअरमन डॉ. मंगला ठोंबरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “प्रत्येक विद्यार्थ्याने स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांची शिकवण आचरणात आणावी, जेणेकरून एक सक्षम समाज घडण्यास मदत होईल.”

धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनी संस्थेचे उपाध्यक्ष तथा रेडक्रॉस कार्यकारिणी सदस्य सुनील पाटील यांनी युवकांच्या शक्तीवर विश्वास व्यक्त केला. “भारत हा तरुणांचा देश असून परिवर्तनाची ताकद युवकांमध्येच आहे, त्यामुळे स्वामी विवेकानंदांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली प्रगती साधावी,” असे प्रतिपादन त्यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य राकेश चौधरी यांनी रेडक्रॉसच्या सेवाकार्याचे कौतुक करून वेळोवेळी मिळणाऱ्या सहकार्याबद्दल आभार मानले.

या कार्यक्रमाला रेडक्रॉसचे सेक्रेटरी सुभाष सांखला, प्रा. डॉ. उमेश वाणी, वाय. जी. महाजन, भारती गायकवाड, कल्पना भारंबे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. सुनिता चौधरी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button