मोहोने-आंबिवली येथे बंजारा समाजाच्या ‘तिज’ महोत्सवाला सुरुवात

१६ ऑगस्ट रोजी कौटुंबिक स्नेह मेळावा आणि तिज विसर्जन कार्यक्रमाचे आयोजन
कल्याण (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या मोहोने-आंबिवली शहरामधे गोरबंजारा तिज उत्सव कृती समिती, आंबिवली परिसरच्या वतीने ७ ऑगस्ट रोजी येथील संत सेवालाल महाराज व आई जगदंबा माता मंदिर येथे बंजारा समाजाचा पारंपरिक सण ‘तिज महोत्सव’ ला महोत्सवाला उत्साहात सुरवात झाली आहे. हा महोत्सव १६ ऑगस्टपर्यंत चालणार असून यानिमीत्त तिज उत्सव कृती समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मोहोने-आंबिवली शहरामधे तिज महोत्सव कार्यक्रम हा पहिल्यांदाच होत असल्याने येथील बंजारा समाजामधे नवचैतन्याचे वातावरण आहे. यानिमीत्त येथील संत सेवालाल महाराज व आई जगदंबा माता मंदिरावर उपस्थित सर्व महिला भगिनी व समाजबांधव यांनी संत सेवालाल महाराज व आई जगदंबा माता की जय या जयघोषामधे तिज रोपण करुन गीत गायन व नृत्य देखील केले.
समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
यामधे ज्या समाजबांधव यांच्या घरी तिज रोपण केले आहे अशा बांधवानी आपल्या घरी दररोज ( ७ ऑगस्ट ते १६ ऑगस्टपर्यंत) वेगवेगळ्या ठिकाणी सर्व महिला भगिनी यांना तिज गायन व नृत्य करण्यासाठी आमंत्रित करायचे आहे. तसेच, १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता येथील संत सेवालाल महाराज व आई जगदंबा देवी मंदिरावर ढंबोळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यानिमीत्त तिज गायन व नृत्य साठी सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यानंतर १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत मुख्य तिज विसर्जन व कौटुंबिक स्नेह मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम देखील संत सेवालाल महाराज व आई जगदंबा देवी मंदिरावर होणार आहे. दुपारी ४ वाजता गणेश घाट, उल्हास नदी, मोहने-आंबिवली येथे तिज विसर्जन करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी मोहने-आंबिवली, अटाळी, वडवली आणि नेपच्यून परिसरातील सर्व समाजबांधव यांनी बंजारा संस्कृतीचा प्रचार, प्रसार व संवर्धन करण्यासाठी पारंपरिक पोषाखामधे सहपरिवार उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन गोर बंजारा तिज उत्सव कृती समिती, आंबिवली परिसरच्या वतीने करण्यात आले आहे.




