गरबा दांडिया वर्कशॉपचे धमाकेदार उद्घाटन

रावेरमध्ये स्वामी स्कूलच्या परिसरात गरबा-दांडिया वर्कशॉप आणि स्पर्धा नारीशक्तीचा जल्लोष!
रावेर (प्रतिनिधी) : शहरात साजऱ्या होणाऱ्या नवरात्री उत्सवात यंदा एक वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे. स्वामी एज्युकेशनल ग्रुपतर्फे आणि स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या परिसरात नारीशक्ती भगिनींसाठी विशेष गरबा-दांडिया वर्कशॉप व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात आजपासून झाली असून, पहिले तीन दिवस गरबा-दांडिया वर्कशॉप आयोजित केले आहे.
ज्यामध्ये सहभागी महिलांना गरबा व दांडियाचे विविध पारंपरिक स्टेप्स, नृत्यशैली आणि सांस्कृतिक महत्त्व सांगितले जात आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस रंगतदार स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष रविंद्र पवार, सचिव मनिषा पवार, संचालिका डॉ. सुखदा पवार आणि संचालक पुष्पक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. महिलांसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे रावेरच्या नारीशक्तीमध्ये एक वेगळी ऊर्जा आणि उत्साह संचारलेला आहे.
विजेत्यांना आकर्षक बक्षीसे
कार्यक्रमाचे कोरिओग्राफिक मार्गदर्शन युवराज महाजन (युवी सर) यांनी केले असून, प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमन मराठे (बडोदा) यांचेही मोलाचे योगदान लाभले आहे. सुनील पवार यांनी विशेष मेहनत घेतली आहे. या वर्षीच्या गरबा स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजे विजेत्यांना भारती ज्वेलर्सच्या वतीने आकर्षक बक्षीसे दिले जाणार आहेत. त्यामुळे महिलांमध्ये उत्साह अधिकच वाढलेला आहे.




