जळगाव जिल्ह्यातील तीन शिक्षकांचा आज होणार गौरव

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील १०९ शिक्षकांची निवड
जळगाव (प्रतिनिधी) : शिक्षक दिनी देण्यात येणारे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार अखेर जाहीर झाले आहेत. राज्य सरकारने १०९ शिक्षकांची निवड केली आहे. २२ सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. विशेष बाब म्हणजे जळगाव जिल्ह्यातील तीन मान्यवर शिक्षकांनाही यावेळी गौरविण्यात येणार आहे.
देशाचे दुसरे राष्ट्रपती, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीला साजऱ्या होणाऱ्या शिक्षक दिनी जाहीर होणारे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार अखेर १८ सप्टेंबर रोजी जाहीर झाले. राज्य सरकारने यंदा १०९ शिक्षकांची निवड पुरस्कारासाठी केली आहे. काही प्रवर्गांमध्ये समान गुण प्राप्त होऊनही पुरस्कारविजेत्यांची संख्या निश्चित असल्याने दोन शिक्षकांना विशेष बाब म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम २२ सप्टेंबर रोजी होणार आहे.
यांचा होणार गौरव
जळगाव जिल्ह्यातील डॉ. अर्चना रमेश विसावे – जि.प. प्राथमिक शाळा, दळवद (ता. पारोळा), नरेंद्र दिनकर महाले – सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, यावल व विजय रामगिर गोसावी – जि.प. प्राथमिक शाळा, कुंभारखेडे (ता. रावेर) यांच्यासह धुळे जिल्ह्यातील अरुणा पवार आणि नागपूर जिल्ह्यातील प्रणोती बागडे यांना विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे.
दोन्ही शिक्षक जिल्हा परिषद शाळेतील
या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग, विद्यार्थ्यांची प्रगती आणि सामाजिक जाण घडविण्यासाठी केलेल्या कार्याची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली आहे. यातील दोन्ही शिक्षक हे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे फलित दिसत आहे.
१०९ शिक्षकांना गुणगौरव पुरस्कार
राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांच्या सात प्रवर्गांमध्ये एकूण १०९ पुरस्कार दिले जातील.
- प्राथमिक शिक्षक – ३८
- माध्यमिक शिक्षक – ३९
- आदिवासी क्षेत्रात काम करणारे शिक्षक – १९
- क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका – ८
- थोर समाजसुधारक विशेष शिक्षक (कला/क्रीडा) – २
- दिव्यांग शिक्षक – १
- स्काऊट गाईड – १
- एकूण १०९




