
जळगाव ( प्रतिनिधी )- श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातर्फे आषाढी एकादशी निमित्त प्लास्टिकमुक्त पर्यावरण दिंडी उत्साहात संपन्न झाली. दिंडी सुरूवातीस प्रथम संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज प्रतिमेचे व वृक्ष पूजन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत नाईक व संचालिका अर्चना प्रशांत नाईक यांच्याहस्ते करण्यात आले.
चिमुकल्यांनी श्री विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई यांचा वेश परिधान करून शाळेपासून रामेश्वर कॉलनी परिसरात विठ्ठल नामाच्या गजरात हातात भगव्या पताका घेऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पाणी वाचवा, झाडे लावा, प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा, स्त्रीभ्रूण हत्या रोखा, असे संदेशपर फलक हातात धरून दिंडी काढण्यात आली. दिंडी मार्गावर विद्यार्थ्यांनी पर्यावरणावर आधारित संदेश असलेल्या मोरणी ज्वेलर्सचे संचालक मिलिंद जैन यांनी दिलेल्या कापडी पिशव्याचे नागरिकांना व दुकानदारांना वाटप करण्यात आले.
या दिंडी सोहळ्याचे संयोजन शाळेचे मुख्याध्यापक तथा इको क्लबचे अध्यक्ष मुकेश नाईक यांनी केले. कार्यक्रमाला सर्व संचालक मंडळ शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग उपस्थित होते.