
काँग्रेस सेवा दल, धुळे जिल्हाध्यक्ष आलोक रघुवंशी यांची मागणी
धुळे (प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन वापरणार असल्याचे सांगितले आहे. मात्र व्हीव्हीपॅट (VVPAT) वापरणार नाही, अशी भूमिका जाहीर केली आहे. यामुळे मतदान प्रक्रियेवरील पारदर्शकतेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावी, अशी मागणी काँग्रेस सेवा दलचे धुळे जिल्हाध्यक्ष आलोक रघुवंशी यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाने मतमोजणीची कठीणता हा मुद्दा सांगितला आहे. परंतु लोकशाहीत पारदर्शकता व विश्वास ही प्राथमिक जबाबदारी आहे. म्हणूनच, बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा निर्णय घ्यावा, हीच जनतेची व काँग्रेस सेवा दलाची एकमुखी मागणी आहे. आयोगाचे म्हणणे आहे की, एका प्रभागातून चार उमेदवार निवडले जात असल्याने व्हीव्हीपॅट वापरणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. पण, व्हीव्हीपॅटशिवाय ईव्हीएम मशीनवर निवडणूक घेणे म्हणजे मतदारांचा विश्वास कमी करणे होय.
अशा आहेत मागण्या
- जर ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट वापरणार नसाल, तर निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या.
- बॅलेट पेपरमुळे मतदारांना पारदर्शकतेचा व सुरक्षिततेचा विश्वास मिळतो.
- निवडणुकीची विश्वासार्हता ही लोकशाहीच्या बळकटीसाठी अत्यावश्यक आहे.




