विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम

“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा”; मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” या विशेष उपक्रमाअंतर्गत कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे विज्ञान शाखेतील प्रवेशीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे तात्काळ निकाली काढून जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विज्ञान शाखेतील प्रवेश घेणारे तसेच सीईटी परीक्षा देणारे आणि डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षातील प्रवेशीत विद्यार्थी यांना या मोहिमेतून लाभ मिळणार आहे. अनु. जाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इमाव व विमाप्र, एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज समान संधी केंद्रांच्या माध्यमातून महाविद्यालय स्तरावर संकलित करण्यात येणार आहेत.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अडचणी येऊ नयेत, यासाठी महाविद्यालयीन समान संधी केंद्रांमार्फत ऑनलाईन वेबिनारचे आयोजन केले जाणार आहे. प्राप्त झालेल्या अर्जांवर तात्काळ कार्यवाही करून वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीने विशेष नियोजन केले आहे.
याशिवाय जिल्हा जात पडताळणी कार्यालयात २४ ते २५ सप्टेंबर तसेच २९ ते ३० सप्टेंबर या कालावधीत त्रुटी पूर्तता मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांच्या अपूर्ण अर्जातील त्रुटी दुरुस्त करून प्रकरणे निकाली काढण्यात येतील. जिल्ह्यातील विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थी, सीईटी परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयात पूर्ण अर्ज सादर करून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करावे आणि मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव एन. एस. रायते यांनी केले आहे.




