क्राईमजळगावताज्या बातम्या

दोन्ही अट्टल दुचाकी चोरणारे पोलिसांच्या जाळ्यात !

जळगाव (प्रतिनिधी) : परिसरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमधील चोरांच्या शोधात असलेल्या शहर पोलीस गुन्हे शाखेच्या पथकाने दोन अट्टल दुचाकी चोराला अटक केली. या कारवाईमुळे शहरासह धुळे जिल्ह्यातील साक्री पोलीस स्टेशन हद्दीतील अशा एकूण दोन दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. या आरोपींकडून दोन चोरीच्या दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत.

जळगाव शहरातील हमाल वाडा, शिवाजी नगर येथे राहणारे उदयकुमार सुभाष कोचुरे यांची २४ ऑगस्ट रोजी रात्री ३० हजार रुपये किमतीची होंडा ॲक्टिव्हा मोपेड चोरीला गेली होती. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी दोन पथके तयार केली होती. या पथकांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, तात्काळ कारवाई करत इरफान खान उस्मान खान पठाण (वय २१, रा. साक्री, जि. धुळे, ह.मु. जळगाव) याला ताब्यात घेतले.

इरफानची कसून चौकशी केली असता त्याने आपला मित्र अदिल शेख उर्फ नाट्या माजिद शेख (वय १९, रा. गेंदालाल मिल, जळगाव) याच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांनाही अटक करून चोरीची मोपेड जप्त केली. पोलीस कोठडीत असताना इरफानची अधिक चौकशी केली असता त्याने आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्याने साक्री पोलीस स्टेशन हद्दीतून एक हिरो होंडा कंपनीची फॅशन प्रो मोटारसायकल चोरी केली होती. साक्री पोलीस स्टेशनमध्येही या चोरीचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी ती मोटारसायकलही जप्त केली आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार सुनील पाटील, पोलीस हवालदार उमेश भांडारकर, सतीश पाटील, योगेश पाटील, नंदलाल पाटील, विरेंद्र शिंदे, दीपक शिरसाठ, भगवान पाटील, पोलीस नाईक सुधीर साळवे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल ठाकूर, भगवान मोरे, प्रणय पवार आणि राहुलकुमार पांचाळ यांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button