
आयपीएचए महाराष्ट्र आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘सार्वजनिक आरोग्य क्विझ – २०२५’ चे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : आयपीएचए महाराष्ट्र आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सार्वजनिक आरोग्य क्विझ – २०२५’ ची राज्यस्तरीय फेरी ११ जुलै रोजी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालय, जळगाव खुर्द येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (कूपर) वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथील स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी करत ‘डॉ. जल मेहता ट्रॉफी’ जिंकत प्रथम क्रमांक पटकावला.
या वेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील ऑनलाईन सहभागी झाले होते. तर उपस्थित मान्यवरांमध्ये सचिव डॉ. वर्षा पाटील, डी.एम. कार्डिओलॉजी डॉ. वैभव पाटील, निवृत्त वैद्यकीय संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, आयपीएचए ट्रेझरर डॉ. नंदकुमार साळुंखे, आयपीएचए उपाध्यक्ष आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोलंके, राज्य समन्वयक डॉ. योगिता बावस्कर, आयोजन प्रमुख डॉ. दिलीप ढेकळे, कम्युनिटी मेडिसिन विभागप्रमुख यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व शारदापूजनाने करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील विविध विभागप्रमुख आणि प्राध्यापकांचीही उपस्थिती होती.डॉ. उल्हास पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महाविद्यालयातील कम्युनिटी मेडिसिन विभागाच्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच महाविद्यालय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यास सज्ज असल्याचे सांगत अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोलंके व त्यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या. डॉ. नंदकुमार साळुंखे यांनी आयपीएचए क्विझचे महत्त्व उलगडून सांगितले.
स्पर्धेत पाच संघांचा सहभाग
स्पर्धेत सामाजिक आरोग्य, महामारी व्यवस्थापन, पोषण, जल स्वच्छता, प्राथमिक आरोग्य सेवा, रुग्णसंख्या नियोजन अशा विविध विषयांवरील प्रश्न विचारण्यात आले. एकूण पाच संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. पाच वेगवेगळ्या फेर्यांमधून ही स्पर्धा पार पडली. यामागचा उद्देश म्हणजे सार्वजनिक आरोग्य विषयावर जागरूकता वाढवणे, विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानातून प्रेरणा देणे व आरोग्यविषयक धोरणांबाबत सजगता निर्माण करणे हा होता. डॉ. निलेश बेंडाळे व डॉ. झशांक जोशी यांच्यावर प्रश्न विचारण्याची जबाबदारी तर धावफलक विजय मोरे व डॉ. प्रियांका येणकुरे यांनी उत्कृष्टरित्या सांभाळला. स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोलंके आणि डॉ. दिलीप ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण समितीने परिश्रम घेतले