आरोग्यजळगावताज्या बातम्यापर्यावरणमहाराष्ट्रयोजनाराष्ट्रीय-राज्यशासकीयशेतकरीशैक्षणिकसमस्यासामाजिक
अतिवृष्टीमुळे जामनेर, पाचोरा व मुक्ताईनगर तालुक्यात मोठे नुकसान

नुकसानग्रस्त भागात जिल्हा परिषद प्रशासनाकडून पाहणी
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा व मुक्ताईनगर तालुक्यात सोमवारी मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. या पूरामुळे ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या तिन्ही तालुक्यांमध्ये नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून ग्रामस्थांना तातडीची मदत मिळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन संपूर्णपणे कार्यरत आहे.
या संकटाच्या काळात जिल्हा प्रशासनासोबतच जिल्हा परिषद प्रशासनाची यंत्रणा देखील मदतीसाठी तत्परतेने कार्यरत झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी देखील स्थानिक यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेतला असून तात्काळ उपाय योजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
- पाचोरा तालुका : पूरग्रस्त भागात गट विकास अधिकारी के. बी. अंजने यांनी मंगळवारी सकाळपासून प्रत्यक्ष फिल्डवर भेट देऊन घराघरांत शिरलेल्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासोबतच आवश्यक उपाययोजना तातडीने सुरू केल्या.
- जामनेर तालुका : नद्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांमध्ये घरात पाणी शिरल्याने ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागले. गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांनी सकाळपासून परिस्थितीवर लक्ष ठेवून युद्धपातळीवर पंचनाम्याचे काम सुरू केले आहे.
- मुक्ताईनगर तालुका : काही गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने गट विकास अधिकारी के. पी. वानखेडे यांनी स्थानिक पातळीवर भेट देऊन पाहणी केली व आवश्यक त्या उपाययोजनांच्या सूचना दिल्या आहेत.




