
पाण्याचा प्रश्न गंभीर ; ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीकडे निवेदन
धामोडी, ता.रावेर (प्रतिनिधी) : धामोडी गावातील संभाजीराजे नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या भागातील नागरिकांना दररोज पिण्यासाठी अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त पाणी मिळत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी ही प्रत्येकाची मूलभूत गरज असताना नागरिकांना अशा प्रकारे दूषित पाणी मिळणे ही दुर्दैवी बाब असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या संदर्भात संभाजीराजे नगरमधील संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन सादर केले. विशेष म्हणजे, नळातून प्रत्यक्ष येणाऱ्या पाण्याची बाटली भरून ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. आणि परिस्थिती किती बिकट आहे हे अधोरेखित करण्यात आले. या पाण्यामुळे मुलांचे, वृद्धांचे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून कुठल्याही क्षणी संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, पाण्याच्या टाकीची योग्य स्वच्छता न केल्यामुळे, तसेच गळकी पाईपलाईन असल्यामुळे पाण्यात गाळ, कीटक व कचरा मिसळत आहे. यामुळे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. अनेक नागरिकांना पोटदुखी, उलट्या, यासारख्या तक्रारी उद्भवत असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, ग्रामसेवक, सरपंच यांनी ग्रामस्थांकडून आलेली तक्रार व निवेदन स्वीकारले असून तपासणी करून लवकरच आवश्यक ती पावले उचलली जातील, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे.
अशा आहेत ग्रामस्थांच्या मागण्या
• पाणीटाकीची संपूर्ण स्वच्छता करून निर्जंतुक करावी.
• पाईपलाईनची तात्काळ तपासणी करून गळती दुरुस्त करावी.
• शुद्धीकरण प्रक्रियेत क्लोरिन व इतर आवश्यक औषधांचा पुरेशा प्रमाणात वापर करावा.
• ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.




