रावेर येथील श्रीकृष्ण गोशाळेजवळ नगरपालिकेच्या सभागृहास मंजुरी

आमदार अमोलभाऊ जावळे यांची वसुबारसच्या निमित्ताने गोप्रेमींना भेट
रावेर (प्रतिनिधी) : रावेर येथील श्रीकृष्ण गोशाळेजवळील नगरपालिकेच्या ओपन स्पेसमधील जागेत आधुनिक सभागृह उभारण्यास मंजुरी मिळाली असून, यामुळे परिसरातील गोप्रेमी तसेच सामाजिक संस्थांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
आज वसुबारसच्या शुभमुहूर्तावर आमदार अमोलभाऊ जावळे यांनी गोप्रेमींना भेट देत सभागृह मंजुरीची माहिती दिली. त्यांच्या या निर्णयामुळे गोसेवा तसेच सामाजिक उपक्रमांना चालना मिळणार आहे.
गोसेवा ही भारतीय संस्कृतीचा आत्मा – आमदार अमोलभाऊ जावळे
हे सभागृह गोसेवा उपक्रम, कीर्तन-भजन, प्रबोधन सभा, योग प्रशिक्षण, आणि सामाजिक-शैक्षणिक उपक्रमांसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे परिसरातील गोप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी आमदार अमोलभाऊ जावळे म्हणाले की, “गोसेवा ही भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. अशा सेवाभावी कार्याला पायाभूत सुविधा देणे ही आपली जबाबदारी आहे.”




