डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नामउल्लेख टाळल्याचा आरोप; मंत्री गिरीश महाजनांविरोधात जामनेरमध्ये तीव्र निषेध मोर्चा

जामनेर (प्रतिनिधी): प्रजासत्ताक दिनी नाशिक येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमातील भाषणात संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामउल्लेख टाळल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जामनेर शहरात मंगळवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. आंबेडकरवादी, परिवर्तनवादी व समविचारी संघटना, सुज्ञ नागरिक तसेच महिला संघटनांच्या संयुक्त वतीने भव्य व आक्रमक निषेध मोर्चा काढण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आला. “बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाही” आणि “लेखी जाहीर माफी द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या मोर्चात सुमारे ८०० ते ९०० नागरिक सहभागी झाल्याची माहिती आहे.
मोर्चानंतर जामनेर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात २६ जानेवारी २०२६ रोजी नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी जाणीवपूर्वक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळल्याचा आरोप करण्यात आला असून, ही बाब केवळ दुर्लक्ष नसून संविधान व लोकशाही मूल्यांचा अपमान असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आंदोलनकर्त्यांनी मंत्री महाजन यांनी देशातील जनतेसमोर लेखी स्वरूपात जाहीर माफी मागावी, अशी ठाम मागणी केली आहे. केवळ तोंडी स्पष्टीकरण स्वीकारले जाणार नसून लेखी माफी न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. तसेच या प्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी मंत्री महाजन यांच्या भूमिकेविरोधात आवाज उठवणाऱ्या माधवी जाधव यांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले. विविध वक्त्यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नव्हे, तर संपूर्ण देशाच्या संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांच्या नावाचा अपमान म्हणजे संविधानाचा अपमान आहे,” असे मत व्यक्त केले.
या निषेध मोर्चामुळे काही काळ जामनेर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता असून मंत्री गिरीश महाजन पुढील भूमिका काय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




