
पर्यावरणपूरक प्रकल्पांना मिळेल प्राधान्य
जळगाव, (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यात पर्यावरणपूरक व यांत्रिक पध्दतीने M-Sand म्हणजे कृत्रिम वाळू (मॅन्युफॅक्चर्ड सैंड) उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांच्या उभारणीसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. महसूल व वन विभागाच्या दिनांक २३ मे २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील इच्छुक उद्योजक, संस्था व कंपन्यांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
या प्रकल्पांसाठी सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावात प्रकल्पाचे संपूर्ण स्वरूप, उद्दिष्ट, जागेचे वितरण व भू-संपत्तीविषयक कागदपत्रे, पर्यावरणीय परवाने व इतर संबंधित यंत्रणांकडून घेतलेली अनुमती, वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीची माहिती, वार्षिक उत्पादन क्षमतेचे विवरण, आर्थिक व तांत्रिक पात्रता दर्शविणारे कागदपत्र तसेच संबंधित अनुभव असल्यास त्याचा तपशील समाविष्ट असणे आवश्यक आहे.
शासन निर्णयातील अटी व मार्गदर्शक तत्वे या प्रक्रियेसाठी लागू राहतील. अपूर्ण प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. प्रस्तावांची अंतिम छाननी करून निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे राहील.
इच्छुकांनी आपले प्रस्ताव आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा थेट जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.