
रावेर (प्रतिनिधी) : शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरुवारी स्वामी विवेकानंद माध्यमिक विभागात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक सन्मान सोहळा मोठ्या धूम धडाक्यात साजरा केला. प्रथम सत्रात विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावत अध्यापन केले. नंतर शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या संचालिका डॉ.सुखदा पवार, इंग्रजी माध्यमाचे प्रिन्सिपल रतिश मोन, माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षिका किर्ती कानुगो, अनिता पाटील उपस्थित होत्या. सुरवातीला प्रमुख पाहुणे व सर्व शिक्षकांचे औक्षण करून व बॅच लावून त्यांचे धडाक्यात स्वागत करण्यात आले. तसेच शिक्षक दिनाचे जनक सर्वपल्ली राधाकृष्नन, पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, आदर्श शिक्षक व गुरुवर्य स्व.राजाराम काशीराम पवार यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्याचबरोबर रयतेचा राजा व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
अतिथिवदेवो भव या उक्ती प्रमाणे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनींनी शिक्षकानं समर्पित असे सुंदर नृत्य सादर केले. सर्व शिक्षकांचा औक्षण करून व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षकांविषयी असलेला आदर त्यातून दिसून आला. दहावीतील चिन्मय लोहार या विद्यार्थ्याने मनोगतातून शिक्षक त्यांना काही प्रेरणा देतात,त्यांचा सर्वागीण विकास घडवून आणतात तसेच प्रत्येक अडचणीत कसा मार्ग दाखवतात हे स्पष्ट केले.
वर्षा अहिरे यांनी विद्यार्थ्यांनी इतका सुंदर कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कोड कौतुक केले, व असा सन्मान केवळ एक दिवस न ठेवता कायम शिक्षकांविषयी आदर मनात ठेवावा असा संदेश आपल्या मनोगतातून दिला. तसेच अनिता शिंदे मॅडम यांनीही विद्यार्थ्यांचे कोडकौतुक केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.सुखदा पवार यांनी प्रथम आपल्या सर्व गुरुवर्य शिक्षकांना शुभेच्छा देऊन त्याच्याविषयी असलेला आदर व्यक्त केला व हे शिक्षक आजही जेव्हा मला गरज असते त्यावेळी कसे मदत करतात हे सांगून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
त्याचप्रमाणे संस्था अध्यक्ष रवींद्र पवार, सचिव मनिषा पवार यांनीही शिक्षकांना शिक्षक दिनानिमिता शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचलन व आभार ही इयत्ता दहावीच्या विद्यार्थींच मानले. कार्यक्रमाची सांगता शेवटी केक कटिंग करून करण्यात आली. यशस्वितेसाठी विद्यार्थ्यांना पर्यवेक्षिका किर्ती कानुगो यांनी मार्गदर्शन केले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही कार्यक्रम यशस्वितेसाठी हातभार लावला.




