
विद्यार्थ्यांनी घेतली शिक्षकांची भूमिका
रावेर (प्रतिनिधी) : स्वामी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन अत्यंत उत्साहात आणि आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी “शिक्षक” बनून प्री-प्रायमरीच्या लहान वर्गांना अतिशय कौशल्याने आणि प्रेमाने हाताळले.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पूजनाने झाली. नंतर “विद्यार्थी-शिक्षकांचे” त्यांच्या वर्गातील लहान मित्रांनी पुष्प आणि पेन देऊन स्वागत केले. या छोट्याशा पण मनाला भिडणाऱ्या उपक्रमातून सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना सन्मान देण्यात आला. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन निशा रायपूरकर यांनी केले. तर मार्गदर्शनपर भाषण अनिता पाटील यांनी केले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रेरणादायी जीवनावर संगीता विंचुरकर, माधुरी वाणी, प्रियंका शिवरामे, माधवी चौधरी, दीपक माळी आणि सुनील पवार यांनी विवेचन केले. त्यांच्या बोलण्यातून मुलांना शिक्षक दिनाच्या खऱ्या अर्थाचे महत्त्व समजले. हा आगळा-वेगळा कार्यक्रम शाळेच्या सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मनापासून अनुभवला व यशस्वी केला.




