पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेतंर्गत जळगावात ८ सप्टेंबर रोजी भरती मेळाव्याचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) : सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेतंर्गत (PM National Apprenticeship) भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), जळगाव (नॅशनल हायवे क्र. ६, तंत्र निकेतन समोर) येथे होणार आहे. शिल्पकारागिर योजनेंतर्गत विविध व्यवसायातील प्रशिक्षण पूर्ण करून उत्तीर्ण झालेले तसेच दहावी, बारावी, डिप्लोमा आणि डिग्रीधारक प्रशिक्षणार्थी यांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. उमेदवारांनी Apprenticeshipindia.org या वेबपोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
या मेळाव्यास जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील नामांकित कंपन्या उपस्थित राहणार असून उमेदवारांना शिकाऊ उमेदवारीसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. प्रशिक्षणार्थी व उमेदवारांनी मेळाव्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन या भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




