
जळगाव (प्रतिनिधी) : विवाहिता आपल्या दीड वर्षाच्या लहान मुलीसह तिची बहिण हे निघ कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्याची घटना शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात शनिवार, ३० ऑगस्ट रोजी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बेपत्ता झाल्यामध्ये २२ वर्षीय विवाहित मुलगी, तिची दीड वर्षाची लहान मुलगी आणि तिची १७ वर्षीय अल्पवयीन बहिण यांचा समावेश आहे. या तिघीही कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रविवारी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
सुप्रीम कॉलनीतील भापसानगर भागातील मंगलाबाई वंजारी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मोठी मुलगी सीमा समाधान वंजारी (वय २२), तिची दीड वर्षाची मुलगी निधी शुभम कापसे (वय १ वर्ष ६ महिने) आणि फिर्यादीची लहान मुलगी दिपाली समाधान वंजारी (वय १७) अशा तिघीही घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्या आहेत. सकाळी स्वयंपाक करत असताना अचानक त्या बेपत्ता झाल्याचे मंगलाबाई यांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ याची नोंद घेतली. पोलीस हवालदार ईश्वर लोखंडे यांनी तक्रार दाखल करून घेतली.




