
विद्यार्थ्यांनी दिला एकतेचा, सहकार्याचा आणि आनंदाचा सुंदर संदेश
रावेर (प्रतिनिधी) : स्वामी एज्युकेशनल ग्रुपच्या सर्व विभागांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी व गरबा-दांडियाचा भव्य सोहळा स्वामी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रविंद्र पवार, सचिव मनीषा पवार आणि संचालिका डॉ. सुखदा पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण पूजन व गणेश महाआरतीने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुंदर, रंगतदार व कलात्मक नृत्याविष्कार सादर करून प्रांगण दुमदुमून टाकले. सर्व विभागांनी मिळून उंच उंच मानवी मनोरे साकारत प्रथम दहीहंडीला सलामी दिली. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात पहिली दहीहंडी फोडली. माध्यमिक, सेमी विभागाने दुसरी दहीहंडी फोडून सामूहिकता आणि जोशाचे दर्शन घडवले.
गरबा-दांडियाची रंगत
विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत आकर्षक गरबा-दांडिया नृत्य सादर केले. रंग, ताल आणि ऊर्जा यांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले. या कार्यक्रमातून “प्रत्येकाला आपल्या खांद्यावर घ्या, एकत्र उभे राहा, कोणीही मागे राहू नये” असा सामाजिक व मानवीय संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
प्रेरणादायी मार्गदर्शन
या प्रसंगी अध्यक्ष रविंद्र पवार व सचिव मनीषा पवार यांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाच्या शिकवणीचे महत्त्व पटवून दिले व जीवनमूल्यांची शिकवण दिली. यशस्वीतेसाठी विभागप्रमुख माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक राजू पवार, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हिरकणी धांडे, इंग्रजी विभागाचे प्राचार्य डॉ रातीश मौन, स्वामी ऐनपूर मुख्याध्यापक मनू अन्थोनी, पर्यवेक्षिका कीर्ती निळे, अनिता पाटील, शिरीष मैराळे आणि सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
सूत्रसंचालन अनिता पाटील, वर्षा अहिरे आणि गजानन धनगर यांनी केले. विद्यार्थ्यांचे विशेष मार्गदर्शक आनंदकुमार सपकाळ, विष्णू चारण, विपूल चौधरी, राहूल राजेंद्रन, मंगेश महाजन, प्रविण चौधरी, पवन पाटील, आश्विन महाजन आणि डान्स मार्गदर्शक युवराज महाजन, सुनील पवार यांची मेहनत रंगास आली.




