
धामोडी परिसरात या घटनेमुळे खळबळ; गुन्हा दाखल
धामोडी, ता. रावेर (प्रतिनिधी) : धामोडी-कांडवेल रस्त्यावरील असलेल्या श्री स्वामी समर्थ तोलकाटा या ऑफिसचे कुलूप तोडून मौल्यवान साहित्य चोरी झाल्याची घटना २९ रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धामोडी येथील हेमंत शामराव महाजन यांचे धामोडी-कांडवेल रस्त्यावर श्री स्वामी समर्थ तोलकाटा ऑफिस आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी २८ रोजी रात्री ऑफिस बंद केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते आले असता ऑफिसमधील मौल्यवान साहित्याची चोरी झाल्याचे लक्षात आहे. याबाबत त्यांनी पोलिसांना कळविले.
या साहित्याची झाली चोरी
चोरी झालेल्या साहित्यामध्ये बॅटरी, इन्व्हर्टर, सुरक्षा कॅमेरे तसेच डीव्हीआरचा समावेश असून ही साधने तोलकाट्याच्या कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे हेमंत महाजन यांनी सांगितले. या घटनेमुळे तोलकाट्याचे नियमित कामकाज देखील विस्कळीत झाले आहे.
पोलिसांचा तपास सुरू
तक्रार मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून अज्ञाताचा शोध सुरू करण्यात आला आहे. हेमंत महाजन यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे चोरी गेलेल्या साहित्याचा शोध घेऊन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निंभोरा येथील एपीआय हरिदास बोचरे यांनी पुढील तपासणीसाठी कर्मचाऱ्यांना सुचना केल्या.




