
रावेर (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृतीतील भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा सुगंध साठवणारा जन्माष्टमीचा उत्सव मॅक्रो व्हिजन अकॅडमी, रावेर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पूर्व प्राथमिक विभागाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सजवलेल्या रंगीबेरंगी वेशभूषेतून जणू संपूर्ण शाळाच वृंदावनधामात परिवर्तित झाली होती.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजन व श्रीकृष्ण पूजनाने झाली. पूजनाचा मान शाळेच्या संचालिका वनिता पाटील व मुख्याध्यापक जनार्दन धनगर (जे. डी. सर) यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी सर्वज्ञा पाटील व फाल्गुनी महाजन यांच्या सुरेख सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत अधिक खुलली.
मंचावर कृष्णजन्माचा अद्भुत प्रसंग साकारण्यात आला. ‘नंदघरी आनंद भयो’ या गजरात बालकृष्णाचा जन्म होताच प्रेक्षकांची मने भारावून गेली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रासलीला नृत्याने वृंदावनातील भक्तिभावनेची झलक साकारली. चिमुकल्या मुलींच्या गौळणी व रंगतदार गरबा नृत्याने वातावरण आनंदी झाले.
संपूर्ण शाळेतील उत्साहाचे केंद्रबिंदू ठरलेली दहीहंडी विद्यार्थ्यांनी हसतखेळत पूर्ण केली. “गोविंदा आला रे आला” या गजराने शाळेचे प्रांगण दुमदुमून गेले. तसेच विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे सजवलेल्या टोपलीतून छोट्या श्रीकृष्णाचे आगमन. तो देखावा पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाला शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख आरती पाटील व समन्वयक दिपाली पाटील यांनी केले. यशस्वीरितेसाठी शाळेचे समन्वयक संदीप दांडगे व शिक्षिका संगीता कोळी यांचे सहकार्य लाभले .
शेवटी आभार प्रदर्शन इयत्ता सहावीची कृतिका महाजन हिने केले. संपूर्ण उत्सवाने विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, श्रद्धा, संस्कार आणि एकोप्याचा सुंदर संदेश दिला. शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील आणि जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील, शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक व आनंद व्यक्त केला आहे. तसेच शाळेचे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले, डायरेक्टर धनराज चौधरी यांनी विद्यार्थ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या.



