MSEB च्या नावाखाली लाकूड सॉमिल वाल्यांचा गोरख धंदा, वनविभागाचे डोळे झाक ऑपरेशन

रावेर तालुक्यातील डेरेदार वृक्षांची वारेमाफ कत्तल; वनविभागाच्या डोळेझाक पणामुळे लाकूड सॉमिल वाल्यांची कमाई
रावेर (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या रसलपूर – आभोडा रस्त्याच्या बाजूला असलेल्या डेरेदार वृक्षांची वारेमाफ कत्तल करण्यात आलेली आहे. तालुक्यातील MSEB चे नवीन तार ओढण्याचा नावाखाली डेरेदार वृक्षांची वारेमाफ कत्तल करून वनविभागाच्या डोळेझाक पणामुळे लाकूड सॉमिल वाल्यांची कमाई सुरु असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
सातपुड्याचा पर्वत लाभलेला रावेर तालुका या सातपुड्याला बोडखे करण्याचे काम वर्षानुवर्षांपासून सुरु असून दिवसेंदिवस सातपुडा उजाड होत आहे. असंख्य अतिक्रमणांचा सामना आजही वन विभाग करत आहे. 15-20 वर्षांपूर्वी रावेर तालुक्याला लागून असलेला सातपुडा पर्वत हा नैसर्गिक दृष्ट्या बहरलेला होता पण वन विभागाच्या डोळेझाक पणामुळे व फक्त दिखाऊकामांमुळे सातपुड्याची लखतरे ओढली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे वनराई कमी होतांना दिसून येत आहे वन विभागामार्फत रावेर परिक्षेत्रामध्ये 10 वर्षापूर्वी 5 कोटी वृक्ष लावण्यात आले होते.
या 5 कोटी वृक्षांच्या लागवड व संगोपनासाठी कोट्यावर्षीचा खर्च त्यावेळी करण्यात आला होता. नक्कीच कोट्यावधी खर्च केल्यामुळे सातपुड्याच्या कुशीत 5 कोटी वृक्षांची वृद्धी होऊन किमान 5 कोटी वृक्ष 10 वर्ष वयाचे असावेत त्यामुळे घनादाट अरण्य तयार देखील झाले असावेत. मात्र प्रशासनाच्या डोळेझाक पणामुळे व अर्थपूर्ण संबंधामुळे वृक्षतोड, अंजन वृक्षाचा पाला, लाकडांची तस्करी मोठ्या प्रमाणात होतांना दिसून येत आहे. एकीकडे वनविभाग पाल येथे पालक मंत्र्यांचा हस्ते पर्यटन क्षेत्रासाठी उदघाटनाचा कार्यक्रम आयोजित करते तर त्याच दिवशी MSEB च्या नवीन तारा ओढण्यासाठी वन विभागाच्या सहमतीने डेरेदार वृक्षांच्या मोठमोठ्या फांद्यांची कत्तल करण्यात आली आहे.
जवळपास 10 ट्रक लाकूड निघेल एवढी झाडांची कत्तल करुन लाकडे रसलपूर – आभोडा रस्त्याने करण्यात आलेली आहेत वन विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी वृक्षतोड करण्याची, फांद्या कापण्याची परवानगी दिली ? कापलेल्या फांद्यांचे जवळपास 10 ते 12 ट्रक लाकडांची विल्हेवाट प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात आली काय ? कापलेल्या फांद्यांना एकत्रीत करून त्यांचा पंचनामा करून, रक्कम निर्धारित करून ती शासनाकडे जमा करण्यात आली काय ? वनविभागाला नागरिकांनी सतर्क करून देखील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोणतेही पावले का उचललेली नाही ? कर्मचारीच यात समाविष्ट तर नाही ना ! अशी शंका व्यक्त होत आहे. सातपुड्याचा बचाव होण्यासाठी वृक्षप्रेमी एकवटतील काय ? असे अनेक प्रश्नांची उत्तरे वनविभाग देईल काय ? कि वृक्षांची कत्तल होतच राहील असे जनसामान्यांना प्रश्न पडत आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी जनतेतून मागणी होत आहे.




