देशाच्या आर्थिक विकासासाठी संशोधन महत्वाचे : सुजय जाधव

बेंडाळे महिला महाविद्यालयात ‘संशोधनाकडे वळा’ या विषयावर सेमिनार
जळगाव (प्रतिनिधी) : येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील ‘संशोधन विकास समिती’ आणि ‘संशोधक प्रेरणा समिती’ तसेच मराठी विज्ञान परिषद, (जळगाव विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संशोधनाकडे वळा’ या विषयावर सेमिनारचे आयोजन महाविद्यालयात शनिवारी करण्यात आले. या सेमिनार अंतर्गत मुंबई येथील टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या केंद्राचे, संशोधक सुजय विजय जाधव यांनी मार्गदर्शन करताना, “देशाच्या आर्थिक विकासासाठी संशोधन महत्वाचे ठरते” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.जे.पाटील हे उपस्थित होते. संशोधन विषयाची विद्यार्थिनींना आवड निर्माण व्हावी व त्यातून समाजपयोगी संशोधन व्हावे, या उद्देशान या सेमिनारचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले. याप्रसंगी वक्ते सुजय जाधव यांनी या सेमिनारद्वारे संशोधनाचा अर्थ, संशोधनाचा हेतू, संशोधनाची गरज, संशोधन समस्या निवड, संशोधनाची सामाजिक उपयुक्तता, संशोधकाची क्षमता व गुणवैशिष्ट्ये आदी मुद्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थिनींना संशोधन करण्यासाठी उपलब्ध शिष्यवृत्ती संदर्भात माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. व्ही. जे. पाटील यांनी विद्यार्थिनींना संशोधनाचे महत्व पटवून दिले. यावेळी व्यासपीठावर मराठी विज्ञान परिषद, जळगाव शाखेचे सचिव प्रा. दिलीप भारंबे, कोषाध्यक्ष शशिकांत नेहेते, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी. एन.तायडे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. शिला राजपूत यांनी केले. याप्रसंगी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी व प्राध्यापक बंधू भगिनी मोठया संख्येने या उपस्थित होते.




