
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील ऐनपूर येथील स्वामी अकॅडमी शाळेत शनिवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला व दही हंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते.
गावातील पालक प्रतिनिधी अतुल पाटील यांच्या हस्ते राधा कृष्ण यांचे पूजन करून पुष्पहार घालण्यात आले. यानंतर प्रभातफेरीला सुरुवात झाली. दरम्यान बसस्थानकावर असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला शाळेचे मुख्याध्यापक मनु अँटोनी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी टिपऱ्यांच्या साहाय्याने आपली दांडिया पथकला व नृत्य कला सादर केली. या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.
गावातील महादेव मंदिराच्या आवारात आणि शाळेच्या आवारात दही हंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला. दोन्ही ठिकाणाची दहीहंडी दुसरीचा विद्यार्थी समर्थ सदाशिव पाटील याने फोडली. यानंतर विद्यार्थ्यांना दही, साखर व लाहया मिश्रित गोड प्रसाद वाटप करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक मनु अँटोनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. मुख्य सूत्रसंचालन मिलिंद पाटील यांनी केले.
यशस्वीतेसाठी निलेश महाजन, अनिकेत महाजन, शारदा कोंडे, रुपाली कोंडे, आशा लोहार, रुपाली महाजन, अनुपमा पाटील, पल्लवी महाजन, नेहा पाटील, निकिता राणे, आशाताई सोनार, शीतलताई महाजन यांनी परिश्रम घेतले.




