
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद येथे आज शिवांश क्रिएशन अँड इंटरटेनमेंट व सहनिर्माता बंधन प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित होणाऱ्या ‘काजळी’ या मराठी चित्रपटाचा भव्य मुहूर्त सोहळा उत्साहात पार पडला. या मुहूर्ताचे उद्घाटन जळगावचे माजी खासदार व गोदावरी समूहाचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी डॉ. पाटील यांनी, या टीमचा याआधी प्रदर्शित झालेला ‘ते दहा दिवस’ या चित्रपटाचा विशेष गौरव करत ‘काजळी’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. यावेळी लालचंद पाटील (माजी उपाध्यक्ष, जळगाव जिल्हा परिषद), पंकज महाजन (माजी सरपंच, नशिराबाद) विकासराव पाटील (माजी सरपंच), मुकुंदा रोटे (जळगाव जिल्हा मनसे प्रमुख), योगेश पाटील, पत्रकार नितीन नांदुरकर, रवींद्र म्हसकर, भागवत चौधरी, वसंतराव ठाकूर, क्रांतिकांत चौबे (माजी उपसरपंच, नशिराबाद), ज्ञानदेव पाटील ‘ते दहा दिवस’ चित्रपटाचे निर्माता- दिग्दर्शक भारत वाळके आदी उपस्थित होते.
‘काजळी’ चित्रपटाचे लेखक-दिग्देशक व निर्माता म्हणून शामाकांत चौधरी काम पाहणार असून, छायाचित्रण योगेश ठाकूर यांच्या हातून साकारले जाणार आहे. तर कार्यकारी निर्माता म्हणून लोकेश भालेराव जबाबदारी पार पाडणार आहेत. मुहूर्त सोहळ्यामुळे जळगावच्या चित्रपटसृष्टीत नवी ऊर्जा निर्माण झाली असून आगामी काळात ‘काजळी’ या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.




