
मानसोपचारतज्ज्ञ डॉ.अनिरूध्द साळुंखे यांचे प्रतिपादन, डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात व्याख्यान
जळगाव (प्रतिपादन) : येथील डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सकारात्मक मानसिक आरोग्य आणि ताण व्यवस्थापन’ या विषयावर व्याख्यान झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.सत्यजित साळवे हे होते. प्रारंभी मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अशोक पाटील यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मानसिक तणाव,अभ्यासाचा ताण, परीक्षेचे दडपण या उद्दिष्टपूर्तीसाठी संघर्षाचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर ‘मनाचे आरोग्य’ विषयावर सिव्हील हॉस्पिटल जळगाव येथील मानसोपचारतज्ञ डॉ. अनिरुद्ध साळुंखे यांच्या विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
मान्यवरांनी केले मार्गदर्शन
याप्रसंगी मा.अनिरुद्ध साळुंके यांनी ‘गुड स्ट्रेस’, वेळेचे व्यवस्थापन, हॅपी हार्मोन्स आणि परीक्षेपूर्वीचा मानसिक ताण या संकल्पनांची विद्यार्थिनींना सुलभ भाषेत ओळख करून दिली. तसेच आत्मविश्वास वाढविण्याचे आणि परीक्षांचा ताण न घेता सकारात्मकतेने सामोरे जाण्याचे मार्ग सांगितले. त्यानंतर दौलत निमसे यांनी स्वतःला आनंदी ठेवण्याचे उपाय, कर्तृत्वाकडे वाटचाल आणि ध्येयपूर्तीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न या विषयांवर मार्गदर्शन करत विद्यार्थिनींना सकारात्मक जीवनविषयक दृष्टीकोन विकसित करण्याचे आवाहन केले. या पुढील सत्रात ज्योती पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘मनातले बोलू काही’ या हेल्पलाइन सेवेची माहिती देत, तणावग्रस्त अवस्थेत असलेल्या विद्यार्थिनींनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य डॉ.सत्यजित साळवे यांनी विद्यार्थिनींसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव, समुपदेशन विभाग आणि मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात समुपदेशन कक्षाच्या वतीने महिन्यातील एक दिवस समुपदेशन सत्राचे आयोजन केले जाईल व तज्ञ समुपदेशकांच्या मदतीने समस्याग्रस्त विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात येईल.या नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थिनींना मानसिक दृष्ट्या सक्षम केले जाईल असा विचार त्यांनी मांडला.
सूत्रसंचालन व आभार पौर्णिमा सुरवाडे हिने केले. यशस्वीतेसाठी डॉ. राणी त्रिपाठी, प्रा.नुरी तडवी, प्रा. पूनम खडके, प्रा. कीर्ती महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.




