अभिवादनआरोग्यकलाकारजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यसामाजिक

पाडवा पहाट कार्यक्रमास रसिकांची उत्स्फूर्त दाद

जळगाव (प्रतिनिधी) : स्वर्. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित २४ व्या “पाडवा पहाट” या प्रातःकालीन मैफलीचे आयोजन महात्मा गांधी उद्यानात पहाटे ६ वाजता करण्यात आले होते. यामध्ये प्रख्यात राष्ट्रीय कीर्तनकार, शास्त्रीय तसेच नाट्यसंगीत गायक व नट डॉ. चारुदत्त आफळे यांच्या नाट्यसंगीत व अभंग वाणी या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार गुरुवंदना जळगावचे गायक वरुण नेवे यांनी सादर केली. त्यानंतर दीप प्रज्वलन डॉ. रणजीत चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर व सचिव अरविंद देशपांडे तसेच आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती डॉ. चारुदत्त आफळे यांनी केले. कलाकारांचा सत्कार मेजर नानासाहेब वाणी, विवेकानंद कुलकर्णी अरविंद देशपांडे व शरदचंद्र छापेकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा नाईक गोडबोले हिने केले. आणि सुरू झाला १८८२ सालापासूनचा संगीत नाटकातील नाट्यपदांचा प्रवास.


कार्यक्रमाची सुरुवात “पंचतुंड नर रुंड माल धर” या नांदीने झाली. संगीत मानापमान नाटकातील अत्यंत गाजलेले पद “चंद्रिका ही जणू”, हे नाट्यपद अत्यंत उत्तम रित्या सादर झाले ते त्यामधील बारकाव्यां सकट. संत कान्होपात्रा नाटकातील “पतीत तू पावना” हे पद सादर केले. रणदुंदुभी नाटकातील “दिव्य स्वातंत्र्य रवी” हे पद सादर केले. देव दिना घरी धावला नाटकातील “ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी” हे पद त्याच्या भावार्थासह सादर केले. सं. मत्स्यगंधा नाटकातील जितेंद्र अभिषेक यांनी संगीतबद्ध केलेले “गुंतता हृदय हे” या नाट्यपदाने रसिकांना अक्षरशः खिळविले. त्यानंतर सं. कट्यार काळजात घुसली नाटकातील “तेजोनिधी लोह गोल ! भास्कर हे गनन राज” व “सुरत पिया की छिन् बिसुराये” ह्या पदाने तर रसिकांना मंत्रमुग्ध केले. “सर्वात्मका सर्वेश्वरा” या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. सुमारे दोन तास सुरू असलेली ही सुरेल मैफल केव्हा संपली हे रसिकांच्या लक्षातही आले नाही.

जळगाव शहराचे आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांनीही या मैफलीचा आस्वाद घेतला. अनेक मान्यवरांसह जळगाव शहरातील तमाम रसिक वर्ग या मैफिलीने मंत्रमुग्ध झाला. या मैफिलिस कै. नथ्थुशेट चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचे सहकार्य लाभले. पाडवा पहाट कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्निग्धा कुलकर्णी, प्रसन्न भुरे, अथर्व मुंडले, वरूण नेवे, वरूण देशपांडे, अनघा नाईक गोडबोले आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button