
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराला यश; अजिंठा चौफुल्ली ते चिंचोली विमानतळ मार्गावर उभारणार अत्याधुनिक विद्युत व्यवस्था
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहराच्या वाढत्या विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयाला अखेर प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. अजिंठा चौफुल्ली ते चिंचोली विमानतळ परिसरापर्यंतच्या रस्त्यावर अत्याधुनिक विद्युत प्रकाशयोजना उभारण्यासाठी ₹५ कोटी ५ लाख (₹५.०५ कोटी) खर्चाच्या कामास जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे विमानतळाकडे जाणारा प्रमुख मार्ग रात्रीच्या वेळी अधिक सुरक्षित, प्रकाशमय आणि आकर्षक होणार आहे.
जळगाव विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे वाहनचालक, प्रवासी आणि पादचाऱ्यांना रात्रीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन या मार्गावर कायमस्वरूपी आधुनिक प्रकाशयोजना उभारण्याची मागणी विविध लोकप्रतिनिधींमार्फत सातत्याने करण्यात येत होती.
डीपीडीसी बैठकीत महत्त्वाचा निर्णय
दि. ७ जुलै २०२६ रोजी पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीत या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि जिल्ह्याच्या पायाभूत विकासाला प्राधान्य देत संबंधित विभागांनी प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
लोकप्रतिनिधींचा पाठिंबा
या कामासाठी आमदार राजूमामा भोळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून विषय समितीसमोर प्रस्ताव मांडला होता. त्यांच्या मागणीला बैठकीत उपस्थित सर्व आमदारांनी पाठिंबा दिला. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे आणि खासदार स्मिता वाघ यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधींनीही प्रस्तावाला सकारात्मक समर्थन दिले. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीने प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली.
१५ जुलै रोजी प्रशासकीय मान्यता
समितीची मंजुरी मिळाल्यानंतर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर दि. १५ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी ₹५.०५ कोटींच्या या विकासकामास प्रशासकीय मंजुरी दिली. त्यामुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
विकासाला नवी चालना
या प्रकाशयोजनेमुळे विमानतळाकडे जाणारा मार्ग अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि आधुनिक होणार असून, जळगाव शहराच्या प्रवेशद्वाराची ओळखही अधिक आकर्षक बनेल. वाढत्या हवाई संपर्काला पूरक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.
जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध विभागांमध्ये समन्वय साधला जात असून, लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे अनेक महत्त्वाचे प्रकल्प वेळेत मार्गी लागत असल्याचेही यानिमित्ताने अधोरेखित झाले.



