
नंदुरबार (प्रतिनिधी): शहरातील वैष्णवी गोविंद भामरे हिने अमेरिकेतील एका नामांकित विद्यापीठातून एम.एस. (एआय) पदवीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तिच्या या यशामुळे नंदुरबार जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे.
उच्च शिक्षणासाठी दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत गेलेल्या वैष्णवीने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयात विशेष प्राविण्य मिळवत आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली. विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात तिला सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.
या यशामुळे भारतीय विद्यार्थ्यांमध्ये तिची विशेष दखल घेतली जात असून, दीर्घ कालावधीनंतर अशा प्रकारचे यश मिळाल्याने तिचे कौतुक होत आहे. वैष्णवीने आपल्या मेहनती आणि कौशल्याच्या जोरावर केवळ स्वतःचेच नव्हे, तर महाराष्ट्र आणि नंदुरबार जिल्ह्याचेही नाव उज्ज्वल केले आहे.
वैष्णवी ही नंदुरबार जिल्हा न्यायालयातील अधीक्षक गोविंद उत्तम भामरे यांची कन्या आहे. तसेच ती ठाकूर समाजातील सामाजिक कार्यकर्ते संदीप उत्तम ठाकूर यांची पुतणी आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



