
ग्रामस्थांमध्ये नाराजी; दोन महिन्यांपूर्वी तक्रार, चौकशीसाठी केवळ एकच अधिकारी उपस्थित
रावेर (प्रतिनिधी): तालुक्यातील चर्चेत असलेल्या विवरे बुद्रूक ग्रामपंचायतीत पंधरावा वित्त आयोग व ग्रामनिधी अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये अनियमितता झाल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी दि. २४ फेब्रुवारी रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात सादर केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तालुकास्तरावर समिती स्थापन करून चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून चौकशी संथ गतीने सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, गुरुवार (दि. ९) रोजी तक्रारदारांना ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार तक्रारदार व ग्रामस्थ दुपारी एक वाजल्यापासून कार्यालयात उपस्थित होते. परंतु, चौकशी समितीतील केवळ एकच अधिकारी उपस्थित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी अधिक वाढली.
उपस्थित अधिकाऱ्यांनी तक्रारदारांचे लेखी जबाब नोंदवून घेतले. यावेळी तक्रारदारांनी संपूर्ण समितीने प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन कामांची पाहणी करावी, तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील एमबी बुक आणि संबंधित ठेकेदारांच्या बिलांची सखोल तपासणी करावी, अशी मागणी केली.
काय आहे तक्रार?
ग्रामपंचायत विवरे बुद्रूक येथे पंधरावा वित्त आयोग तसेच ग्रामनिधीतून सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या आर्थिक वर्षात विविध कामे झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक कामे न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच, प्रत्यक्ष कामे न करता बिले काढून लाखो रुपयांचा अपव्यय झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
ग्रामस्थांची भूमिका
ग्रामपंचायत सदस्या मनीषा पाचपांडे यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी लवकर पूर्ण व्हावी आणि समितीच्या सर्व सदस्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन तपासणी करावी. महिला प्रशिक्षणासह इतर कामांमध्येही गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच, ग्रामस्थांनी वित्त आयोग व ग्रामनिधीतून दाखविलेल्या कामांची प्रत्यक्ष पडताळणी, एमबी बुक तपासणी आणि ठेकेदारांच्या बिलांची कागदपत्रांसह छाननी करण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाची भूमिका
या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, दि. ९ रोजी तक्रारदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून पुढील चौकशी नियमानुसार सुरू राहणार आहे.



