
जळगाव (प्रतिनिधी) : जन्मतःच गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या नवजात शिशुचे प्राण जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे वाचवले आहेत. अन्ननलिका आणि श्वासनलिका एकमेकांना जोडल्या गेल्यामुळे निर्माण झालेल्या दुर्मिळ ट्रॅकिओ-इसोफेजियल फिस्टुला या आजारावर यशस्वी उपचार करण्यात आले.
भुसावळ तालुक्यातील एका कुटुंबात जन्मलेल्या बाळाच्या तोंडातून जन्मानंतर सतत फेस येत असल्याचे पालकांच्या लक्षात आले. तसेच बाळाला दूध पाजताना अडचणी येत होत्या. परिस्थिती गंभीर वाटल्याने बाळाला तातडीने जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राथमिक तपासणीत बालरोग तज्ज्ञांनी अन्ननलिकेशी संबंधित गंभीर विकाराची शक्यता व्यक्त केली. त्यानंतर एक्स-रेसह विविध तपासण्या करण्यात आल्या. तपासणीअंती बाळाला ट्रॅकिओ-इसोफेजियल फिस्टुला हा जन्मजात विकार असल्याचे स्पष्ट झाले. या स्थितीत अन्ननलिका आणि श्वासनलिका एकमेकांशी जोडलेल्या असल्याने अन्न किंवा दूध पोटात जाण्याऐवजी श्वासनलिकेत जाण्याचा धोका निर्माण होतो, ज्यामुळे जीवाला गंभीर धोका संभवतो.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रिया विभागाच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने सुमारे दीड तास चाललेली ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. या प्रक्रियेदरम्यान अन्ननलिका आणि श्वासनलिका वेगळ्या करून त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर नवजात शिशुला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. डॉक्टरांच्या सततच्या देखरेखीमुळे आणि योग्य उपचारांमुळे बाळाची प्रकृती आता धोक्याबाहेर आली आहे.
रुग्णालयातील शल्यचिकित्सक आणि बालरोग तज्ज्ञांच्या समन्वयातून पार पडलेल्या या यशस्वी उपचारामुळे नवजात शिशुला नवजीवन मिळाले असून, पालकांनी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.



