
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्यभर “अमृत परिवार सर्वेक्षण अभियान” राबविण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण ८ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये पार पडणार आहे.
या उपक्रमाद्वारे खुल्या प्रवर्गातील विविध समाजघटकांतील सुमारे २५ जातींच्या कुटुंबांची माहिती संकलित केली जाणार आहे. यामध्ये कुटुंबांची सामाजिक व आर्थिक स्थिती, कौशल्ये, अपेक्षा आणि स्थानिक संसाधनांचा अभ्यास केला जाणार आहे.
अमृत संस्थेकडून व्यक्तिमत्व विकास, कौशल्यविकास, रोजगाराभिमुख प्रशिक्षण, उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन तसेच उद्योग-व्यवसाय वाढीसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे देण्यासाठी आणि योग्य नियोजनासाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.
सर्वेक्षणाच्या कालावधीत अमृत संस्थेचे प्रतिनिधी संबंधित गटांशी थेट संपर्क साधणार असून विविध सामाजिक संस्था, संघटना आणि मंडळांमधील प्रतिनिधींची माहितीही संकलित केली जाणार आहे.
तसेच, लक्षित गटातील कुटुंबे व संस्थांनी अमृतच्या जिल्हा किंवा विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून आपली माहिती नोंदवावी व उपलब्ध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.



