
जळगाव (प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यात सर्व प्रकारची किरकोळ मद्यविक्री बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम १४२ (१) नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश लागू करण्यात आला आहे.
या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या किरकोळ मद्यविक्री परवानाधारकांनी संबंधित दिवशी आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवणे बंधनकारक राहणार आहे. यामध्ये देशी व विदेशी मद्य विक्री दुकाने, परमिटरूम, बिअर शॉप तसेच ताडी दुकाने यांचा समावेश आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकांवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सर्व संबंधितांनी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



