
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयोजित तिरळेपणा (भेंगडेपणा) निदान व शस्त्रक्रिया शिबिराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिबिराच्या पहिल्याच दिवशी सुमारे १५० रुग्णांची नोंदणी करून त्यांची सविस्तर तपासणी करण्यात आली.
हे शिबिर राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम व जिल्हा अंधत्व नियंत्रण उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर, पुण्यातील नेत्रतज्ज्ञांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे. दि. १ व २ एप्रिल रोजी प्राथमिक तपासणीनंतर तज्ज्ञ डॉक्टरांची टीम जळगावात दाखल झाली असून शस्त्रक्रिया सत्रास प्रारंभ करण्यात आला आहे.
उद्घाटन प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शिबिरात अनुभवी नेत्रतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची तपासणी व आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया केली जात आहे. सुमारे २० डॉक्टरांचा संघ या उपक्रमात सहभागी असून रुग्णांना मोफत सेवा दिली जात आहे.
दि. ३ ते ५ एप्रिलदरम्यान गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून या कालावधीत अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचे तिरळेपणा निदान व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आल्याने नागरिकांकडून त्याचे स्वागत होत आहे. या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना तज्ज्ञ उपचार सहज उपलब्ध होणार आहेत.



