
रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यात शासकीय ई-सेवा केंद्रांमार्फत बनावट ७/१२ उतारे तयार करून खोटी लागवड नोंद दाखवून शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात तहसील कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, जिल्ह्यातील अनेक व्यापाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार करून शेतकरी असल्याचे भासवले. त्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित प्रकरणात काही शासकीय यंत्रणा, CSC केंद्रे तसेच अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयास्पद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
७/१२ उतारे डिजिटल स्वरूपात असतानाही त्यात फेरफार करून खोटी माहिती नोंदवली गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. पिक पाहणी प्रक्रिया, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची पडताळणी यामध्ये त्रुटी राहिल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
तक्रारदाराने SIT (विशेष तपास पथक) मार्फत चौकशी करण्याची मागणी केली असून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि संगणक प्रणालीशी जोडलेल्या व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात यावी, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे निष्पाप शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून पुढील चौकशीनंतर मोठे गैरव्यवहार समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



