साहित्यिकजळगावताज्या बातम्याशैक्षणिक

रावेर येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा


रावेर (प्रतिनिधी):
स्वामी इंग्लिश मीडियम स्कूल, रावेर येथे दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला स्वामी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मा. रविंद्र पवार सर प्रमुख अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक डॉ. रतिश मोन ए. व्ही., उपमुख्याध्यापिका श्रीमती अनिता शिंदे, प्रशासक शिरीष मैराळे, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन मा. रविंद्र पवार सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी मराठी संस्कृतीचा जागर घडवत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. ‘मायबोली मराठी’, ‘गौरव महाराष्ट्राचा’, ‘मी मराठी’, ‘राजे आले’, लावणी, कीर्तन, संत एकनाथांचे भारूड, ‘कृष्णाची गवळण’, ‘शिवकन्या लाठीकाठी’, पारंपरिक लोकगीत आदी सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. ‘आई हे मायबोलीतील गीत’ हर्षाली मोरे यांनी भावपूर्ण सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा पोवाडा राहुल महाजन यांनी दमदार शैलीत सादर करून वातावरण भारावून टाकले. आकर्षक फलक लेखन समीर खराले यांनी केले. सहभागी विद्यार्थ्यांना युवराज महाजन सरांनी भेटवस्तू देऊन गौरविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना महाजन यांनी सुंदररीत्या केले.

या प्रसंगी गौरंगिनी कासार यांनी मराठी भाषेचा इतिहास, समृद्ध परंपरा आणि आजच्या काळातील महत्त्व याविषयी माहिती दिली. तसेच श्रीमती शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा सन्मान राखण्याचे, नियमित वाचन करण्याचे आणि मायबोलीचा अभिमान बाळगण्याचे महत्त्व पटवून दिले.

अध्यक्षीय भाषणात मा. रवींद्र पवार सर यांनी विद्यार्थ्यांना वाचनाकडे वळण्याचे आवाहन केले. शिक्षकांनीही सातत्याने वाङ्मय वाचन केले तर विद्यार्थी तुमचे अनुकरण करतील, असे ते म्हणाले. मराठी भाषा ही साने गुरुजी, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, व.पु. काळे, दादासाहेब फाळके, वि. वा. शिरवाडकर आणि सुरेश भट यांसारख्या अनेक साहित्यिकांमुळे समृद्ध झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या साहित्यसंपदेचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या परिश्रमांमुळे मराठी भाषा गौरव दिनाचा हा कार्यक्रम आगळावेगळ्या आणि संस्मरणीय स्वरूपात यशस्वीरीत्या पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button