ताज्या बातम्याजळगाव

‘स्मार्ट’ मीटरमुळे दीड कोटींची वीजबिल सवलत

जळगाव परिमंडलातील सव्वादोन लाख ग्राहकांना लाभ

जळगाव (प्रतिनिधी): स्मार्ट टीओडी (टाईम ऑफ डे) मीटर बसवलेल्या जळगाव परिमंडलातील सव्वादोन लाखांहून अधिक घरगुती वीजग्राहकांना गेल्या सात महिन्यांत वीजबिलात एकूण दीड कोटी रुपयांहून अधिक रकमेची सवलत मिळाल्याची माहिती समोर आली आहे. दिवसा वीजवापरावर मिळणाऱ्या सवलतीमुळे ग्राहकांचा आर्थिक फायदा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जुलै 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत जळगाव परिमंडलातील 2 लाख 33 हजार 209 घरगुती ग्राहकांना एकूण 1 कोटी 63 लाख रुपयांहून अधिक टीओडी सवलत मिळाली आहे. यामध्ये जळगाव मंडलातील 1 लाख 37 हजारांहून अधिक ग्राहकांना सुमारे 90 लाख रुपये, धुळे मंडलातील जवळपास 59 हजार ग्राहकांना 40 लाखांहून अधिक तर नंदुरबार मंडलातील 37 हजारांहून अधिक ग्राहकांना 33 लाख रुपयांची सवलत देण्यात आली आहे.

नवीन स्मार्ट टीओडी मीटरमुळे वीजवापराचे रीडिंग स्वयंचलित होत असून ग्राहकांना दर तासाचा वीजवापर मोबाईलवर पाहता येतो. त्यामुळे विजेच्या वापरावर थेट नियंत्रण ठेवणे शक्य होत आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वापरल्या जाणाऱ्या विजेसाठी प्रतियुनिट सवलत मिळत असल्याने वॉशिंग मशीन, गिझर, मायक्रोवेव्ह, एअर कंडिशनर यांसारख्या उपकरणांचा दिवसा वापर केल्यास ग्राहकांना अधिक आर्थिक लाभ होत आहे.

टाईम ऑफ डे प्रणालीनुसार वीज वापराच्या वेळेनुसार दर आकारणी केली जाते. घरगुती ग्राहकांसाठी प्रथमच या पद्धतीने दिवसा स्वस्त वीजदर लागू करण्यात आले आहेत. पुढील पाच वर्षांसाठी टप्प्याटप्प्याने प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत देण्यात येणार आहे.

स्मार्ट टीओडी मीटर हे पोस्टपेड स्वरूपाचे असून पूर्वीप्रमाणेच वीजवापरानंतरच बिल मिळणार आहे. हे मीटर ग्राहकांकडे मोफत बसवले जात असून यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च आकारला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दिवसा वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर बसवणे आवश्यक असल्याने ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button