ताज्या बातम्या

विनापरवाना व निकृष्ट रासायनिक खतांचा साठा जप्त; रावेरमध्ये कृषी विभागाची कारवाई

रावेर (प्रतिनिधी): रावेर तालुक्यात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा कृषी विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करत विनापरवाना व निकृष्ट दर्जाच्या रासायनिक खतांचा साठा जप्त केला आहे. गुजरातमधील राजकोट येथून विक्रीसाठी आणण्यात आलेल्या सुमारे १२ हजार रुपये किमतीच्या अप्रमाणित विद्राव्य एनपीके खतांच्या २८ गोण्या जप्त करण्यात आल्या असून, या प्रकरणी दोन कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

रावेर तालुक्यातील शेतकरी उदयभान पाटील यांनी बाजारात संशयास्पद खतांची विक्री सुरू असल्याची माहिती कृषी विभागाला दिली होती. या माहितीच्या आधारे जिल्हास्तरीय गुणवत्ता नियंत्रण भरारी पथकाने दुपारी छोरिया मार्केट परिसरात छापा टाकला. यावेळी गुजरातमधून आलेल्या एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा साठा आढळून आला.

भरारी पथकाने खतांची तपासणी केली असता, संबंधित खतांना आवश्यक परवाने नसल्याचे तसेच त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत ट्रकसह संपूर्ण साठा जप्त करून पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला. ही कारवाई भरारी पथकप्रमुख पद्मानाभ म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक विकास बोरसे व तालुका निरीक्षक ललित इंगळे उपस्थित होते.

यापूर्वीही याच कंपन्यांच्या खतांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. प्राप्त अहवालात ते निकृष्ट ठरल्याने सदर कारवाईला अधिक बळ मिळाले आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खते खरेदी करावीत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button