
वाघोदा येथे दुर्दैवी घटना
वाघोदा (ता. रावेर) : मोठे वाघोदा येथे पायी चालत असलेल्या युवकाला भरधाव मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. मृताचे नाव उदय प्रभाकर पाटील (वय 44, रा. मोठे वाघोदा, ता. रावेर) असे आहे.
उदय पाटील हे रविवारी सायंकाळी वाघोदा–सावदा रस्त्यावरील एका हॉटेलजवळ फेरफटका मारत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकलने (क्रमांक- एमएच 19 एबी 8410) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर नागरिकांनी त्यांना तातडीने सावदा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी हर्षल प्रभाकर महाजन (वय 37, रा. वाघोदा बुद्रुक) यांनी सावदा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार मोटारसायकल चालक संजय बावस्कर (रा. रोझोदा, ता. रावेर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात मोटारसायकल चालकही जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उदय पाटील यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



