
जळगाव (प्रतिनिधी): युनायटेड जिप्सम कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांच्या वतीने आयोजित बी.पी.एल. सिझन 2 क्रिकेट स्पर्धा दि. 16 व 17 फेब्रुवारी रोजी द्वारकाई स्पोर्ट्स मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे अध्यक्ष महेमुद अली पाशा यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना (उबाठा) गटाचे महानगराध्यक्ष शरद तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक अक्षय वंजारी, नगरसेवक शाकिर खान उपस्थित होते.
या स्पर्धेत एकूण 8 संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये अवध वॉरियर्स (राजू पाशा) हा मागील सिझनचा विजेता संघ, अजमेरी फायटर फकरूद्दीन खान (भुसावळ), मन्नत फायटर साहेब शेख, न्यू भारत बॉईज सलमान खान, किंग्स 11 राजा पाशा, अजमेरी ए.जे. सईद्दुदीन भाई, भुसावळ, ए.जे. वॉरियर्स अजय चौधरी आणि पी.ओ.पी. टायगर्स इमरान खान, खामगाव या संघांचा समावेश होता.
या स्पर्धेत मुंबई, पुणे, नागपूर, जळगाव, भुसावळ, खामगाव आणि रावेर या विविध शहरांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यामुळे स्पर्धेला अधिक रंगत आली आणि सामने अत्यंत रोमांचक झाले. एकूण 12 लीग सामने खेळविण्यात आले. त्यातून उत्कृष्ट कामगिरी करत किंग्स 11, मन्नत फायटर, अवध वॉरियर्स आणि अजमेरी ए.जे. या चार संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. उपांत्य फेरीत किंग्स 11 विरुद्ध अवध वॉरियर्स आणि मन्नत फायटर विरुद्ध अजमेरी ए.जे. असे सामने झाले. दोन्ही सामने अत्यंत चुरशीचे झाले. त्यातून किंग्स 11 आणि मन्नत फायटर यांनी अंतिम फेरीत स्थान मिळवले. अंतिम सामना किंग्स 11 व मन्नत फायटर यांच्यात रंगला. प्रेक्षकांनी या सामन्याचा मनमुराद आनंद घेतला. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत किंग्स 11 संघाने विजेतेपद पटकावले, तर मन्नत फायटर संघ उपविजेता ठरला.
विजेत्या किंग्स 11 संघाला शरद तायडे यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला व सर्व खेळाडूंना पदके देण्यात आली. उपविजेता मन्नत फायटर संघाला नगरसेवक शोएब खटीक यांच्या हस्ते चषक देण्यात आला. विजेत्या संघाला युजीसीए अध्यक्ष महेमुद अली पाशा यांच्या तर्फे 30 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले, तर उपविजेत्या संघाला 15 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युजीसीए अध्यक्ष महेमुद अली पाशा यांच्यासह सचिव राजू पाशा, साहेब शेख, बिलाल खान, कलाम खान, मुख्तार पाशा, बब्लू पाशा, मकसूद पाशा, इकबाल पाशा, मोबीन पाशा, इमरान खान, आरिफ खान, अनवर खान, मेराज पाशा (रावेर) आणि अयाज पाशा यांनी परिश्रम घेतले. सर्वांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वी आणि संस्मरणीय ठरली.



