स्वामी विवेकानंद विद्यामंदिर रावेर येथे संत गाडगेबाबा जयंती स्वच्छता उपक्रमाने साजरी

रावेर (प्रतिनिधी): स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रावेर येथील पूर्व-प्राथमिक व प्राथमिक विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा जयंती स्वच्छता उपक्रमातून साजरी केली. स्वच्छता, शिक्षण आणि माणुसकीचा संदेश देणारे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. ‘हातात झाडू आणि खांद्यावर गाडगे’ घेऊन त्यांनी आयुष्यभर समाजप्रबोधन केले; त्यामुळेच त्यांना स्वच्छतादूत म्हणून ओळखले जाते.
कार्यक्रमाची सुरुवात प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. हिरकणी धांडे यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपशिक्षक डॉ. हितेश भोरटक्के यांनी विद्यार्थ्यांना संत गाडगे महाराज यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर व वर्गखोल्यांची स्वच्छता करत श्रमदान केले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वच्छतेचा संदेश दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.



