
रावेर (प्रतिनिधी): विवरा–रावेर मार्गावर दि. १९ रोजी किराणा दुकानाची वसुली करून परतणाऱ्या एका व्यापाऱ्याला मोटरसायकलवर बसवून १५ हजार रुपयांची लूट करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी रावेर पोलीस ठाणे येथे तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर येथील अनिल सुपारी भांडार या दुकानाचे मालक गोवर्धनदास सफरमल कोटवानी हे काल सकाळी दुकानाची वसुली करण्यासाठी विवरा येथे गेले होते. वसुली आटोपून रावेरकडे येण्यासाठी ते विवरा बस स्टॉपवर बसची प्रतीक्षा करत असताना, एका मोटरसायकलस्वाराने आपण रावेरला जात असल्याचे सांगत त्यांना दुचाकीवर बसवले.
रावेर पोलीस ठाणे हद्दीतील पारश्याच्या नाल्याजवळील शेत परिसरात पोहोचल्यानंतर मोटरसायकलस्वाराने लघुशंकेचे कारण सांगून वाहन कच्च्या रस्त्याकडे वळवले. तेथे आधीच दोन साथीदार थांबलेले होते. तिघांनी मिळून व्यापाऱ्याच्या खिशातून वसुलीची १५ हजार रुपयांची रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेप्रकरणी गोवर्धनदास कोटवानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.



