ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

“हिंद-दी-चादर”शहिदी समागम कार्यक्रमात आत्मसमाधानासाठी योगदान द्यावे  -विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी

नवी मुंबई (प्रतिनिधी): श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ‘हिंद-दी-चादर’ या ऐतिहासिक व प्रेरणादायी कार्यक्रमाच्या आयोजनात कोणत्याही त्रुटी राहू नयेत. प्रशासनाने केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर आत्मसमाधानासाठी समन्वयाने व जबाबदारीने योगदान द्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.

नवी मुंबईतील सेक्टर 29, खारघर येथील ओवे मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा विभागीय आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी घेतला. राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाच्या मार्गदर्शनाखाली ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350 वा शहिदी समागम कार्यक्रम समितीच्या तसेच शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन संप्रदाय व वारकरी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

या ऐतिहासिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक तयारी सुरू असून, विविध विभागांचा समन्वय साधण्यासाठी 26 समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. बैठकीस रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह महसूल, पोलीस, आरोग्य, शिक्षण व महानगरपालिका विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा त्याग, शौर्य व मानवतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावा, असे मत आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. नागपूर व नांदेड येथे हा शहीदी समागम यशस्वीरित्या पार पडला असून, खारघर येथेही अत्यंत शिस्तबद्ध, शांततापूर्ण व उत्साहात कार्यक्रम पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देत सुरक्षा, वाहतूक, वैद्यकीय सेवा, स्वच्छता, निवास, भोजन, प्रसिद्धी, जलपुरवठा व विद्युत व्यवस्थेसाठी स्वतंत्र समित्या कार्यरत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या कार्यक्रमामुळे सामाजिक ऐक्य, सद्भावना व ऐतिहासिक मूल्यांची जाणीव अधिक दृढ होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button