ब्रह्माकुमारीज् तर्फे महाशिवरात्रीनिमित्त जळगावात विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी): महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या ढाके कॉलनी, जळगाव तर्फे विविध आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रद्धा, अध्यात्म आणि ज्ञानाच्या माध्यमातून परमात्मा शिवाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
ढाके कॉलनी येथील ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रात सकाळी ८ वाजता शिवध्वजारोहण व शिवप्रतिज्ञा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून भाविकांना शिवसंदेशाने प्रेरित करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे.
ओंकारेश्वर मंदिर येथे एकवीस हजार रुद्राक्षांनी साकारलेले भव्य शिवलिंग, तसेच ‘स्पिरिच्युअल सायन्स’ मॉड्युल आणि चित्रप्रदर्शनी सकाळी ५.३० ते रात्री ११ या वेळेत सर्वांसाठी खुली राहणार आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम अनुभवण्याची विशेष संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.
शिवधाम मंदिर, निमखेडी येथे रत्नजडित शिवलिंगाची आकर्षक प्रतिकृती व श्रीमद्भागवत गीता ज्ञानप्रदर्शनी सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. गीतेतील जीवनमूल्यांचा संदेश या प्रदर्शनातून दिला जाणार आहे.
तसेच चैतन्य महादेव मंदिर येथे चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून महादेव मंदिर येथे बारा ज्योतिर्लिंग दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पिंप्राळा परिसरात भगवान महाकालेश्वर व बारा ज्योतिर्लिंग दर्शन सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत भाविकांसाठी खुले राहणार आहे.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्व शिवभक्तांनी व नागरिकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांनी केले आहे.



