
१ एप्रिल २०२६ नंतर नजराणा दर वाढणार; मार्चअखेर अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या ४ मार्च २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार “महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग २ व भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतर) नियम, २०२५” अंमलात आले आहेत.
या नियमांनुसार, भोगवटादार वर्ग-२ किंवा भाडेपट्ट्याने धारण केलेल्या शासकीय जमिनीचा मूळ मंजूर प्रयोजनासाठी किमान ५ वर्षे प्रत्यक्ष वापर पूर्ण झाल्यानंतर जमीन वर्ग-१ मध्ये रूपांतरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करता येणार आहे.
३१ डिसेंबर २०२५ नंतर लागू असलेल्या अधिमूल्य दरानुसार कृषी प्रयोजनासाठी ग्रामपंचायत/नगरपालिका हद्दीबाहेरील जमिनींसाठी ASR दराच्या ७५ टक्के तर निवासी, वाणिज्यिक व औद्योगिक प्रयोजनासाठी ASR किमतीच्या ६० ते ७५ टक्के दर लागू राहणार आहेत. तसेच नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका व विशेष नियोजन प्राधिकरण हद्दीतील जमिनींसाठीही ASR दरानुसार अधिमूल्य निश्चित करण्यात आले आहे.
दरम्यान, सन २०२५-२६ चे सुधारित मूल्यांकन दर दि. १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार असल्याने, त्या तारखेनंतर अर्ज करणाऱ्या नागरिकांना वाढीव दराने नजराणा भरावा लागणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पात्र जमीनधारकांनी मार्च २०२६ पूर्वी तहसील कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतरणासाठी अर्ज सादर करून सध्याच्या दरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार (महसूल) ज्योती गुंजाळ यांनी केले आहे.



