ताज्या बातम्या

शिवजयंती निमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

१८ व १९ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय भव्य कार्यक्रम

जळगाव (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्ह्यात दि. १८ व १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाच्या वतीने दोन दिवसीय जिल्हास्तरीय भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सकाळी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार असून, त्यानंतर किल्ले बनविण्याची स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, पराक्रम, विचार व कार्य यांची ओळख करून देण्यात येणार आहे.

या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवनपट उलगडणारा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम व नाट्यप्रयोग छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत कलाकार सहभागी होणार असून, शिवचरित्रावर आधारित सादरीकरणातून उपस्थितांना प्रेरणादायी अनुभव मिळणार आहे.

किल्ले बनविण्याच्या स्पर्धेसाठी आवश्यक माती, बॅरिकेडिंग व मार्किंगची व्यवस्था जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. तसेच चित्रकला स्पर्धेसाठी आवश्यक कागद प्रशासनाकडून पुरविण्यात येणार आहेत. मात्र, किल्ले सजावटीसाठी लागणारे साहित्य तसेच चित्रकलेसाठी लागणारे रंग व अन्य साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणायचे आहे.

या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा जिल्हास्तरावर सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत असून, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.

विद्यार्थ्यांची नावनोंदणी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येणार असून, यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती सर्वांनी एकत्र येऊन शिस्तबद्ध, प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी रोहन घुगे, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button